Additional information
| Author | Bhalchandra Nemade |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171854950 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹400.00
भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ ही कादंबरी स्वतःचे असे वेगळेच प्रभावीपण सिद्ध करणारी आहे. आजच्या काळाचे प्रतिबिंब तिच्यात पुरेपूर उतरले असून ती केवळ एखाद्या तात्कालिक समस्येला हाताळत नाही. कादंबरीच्या आवक्याला पुरेल असाच एक मोठा विषय उकलण्याचा प्रयत्न तिच्यातून लेखकाने केला आहे.
कादंबरीत महत्त्व आहे ते पांडुरंग सांगवीकरच्या जीवनाबद्दलच्या काही कटू पण वास्तव जाणिवा कशा हळूहळू उमगत आहेत याला. त्याला आयुष्याच्या सगळ्या धडपडीचा अर्थ अखेरच्या तडजोडीच्या क्षणांमध्ये उमगतो तो इतकाच की, आपल्यासारख्यांचा जीवनक्रम जन्माला येण्यापूर्वीच समाजाने ठरवून दिलेला आहे. अशा काही गोष्टी आहेत की, त्यातून सामान्य माणसाची सुटकाच होऊ शकत नाही. मरण्यापूर्वी काय काय प्राप्त कर्तव्ये आहेत, तीही जणू नेमून दिलेली आहेत. या आखीव मार्गातून जे सुटतात, त्यांना जे काही वेगळे उमगेल ते उमगेल; पण पांडुरंग सांगवीकरला घाण्याचा बैल झाले पाहिजे.
तरीही पांडुरंग सांगवीकरचा वाचकांवर प्रभाव पडतो, तो निव्वळ घाण्याचा बैल वाटू शकत नाही. कारण बैल असू नये यासाठी तो सुरुवातीपासून तळमळत असतो आणि त्या तळमळीमुळे तो कधीही तिरस्करणीय होऊ शकत नाही. जीवनातल्या चाकोरीबद्धतेला तो सदैव कंटाळलेला आहे. जीवनात काहीतरी ‘थोर’ असावे यासाठी तो नित्य काही ना काही धडपड करतो. जेव्हा जेव्हा जीवन भकास, शून्य, निरर्थक आहे असे जाणवते, तेव्हा त्याला फार भय वाटते व तो त्या भीतीतून बाहेर येण्यासाठी ‘प्रचंड’ धडपड करतो. मग तो संतापतो, वैतागतो, ‘भयानका’ला चेचू पाहतो. जगामधला मोठेपणाचा तमाशा त्याला कॉलेजच्या लहानग्या विश्वातही भासमान होतो. अशी ही एक ध्यास लागलेली; पण ध्येय न मिळालेली एक जिवंत व्यक्तिरेखा ‘कोसला’ या कादंबरीतून नेमाडे यांनी परिश्रमपूर्वक आणि यशस्वी रीतीने उभी केली आहे.
समाजाशी माणूस कसा अगतिकपणे, अजाणतेपणी गुंतलेला आहे आणि स्वतःचे असे महत्त्वपूर्ण एकटेपणच या समाजात किती दुर्लभ आहे, वरकरणी अगदी सामान्य वाटणाऱ्या जीवनक्रमातून मोठ्या भेदक रीतीने पटवून देण्याचा जो प्रयत्न नेमाडे यांनी ‘कोसला’मध्ये केला आहे तो मराठी कादंबरीच्या जगात सर्वस्वी पहिलाच मानावा लागेल.
| Author | Bhalchandra Nemade |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171854950 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.